धरमशाला : टाटा ग्रुपच्या पुढाकाराने धरमशाला, हिमाचल प्रदेश येथील ‘धर्मशाला स्काय-वे’ची उभारणी करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या हस्ते लोकापर्ण झालेल्या या स्कायवेने आज एक लाख यशस्वी आणि सुरक्षित फेर्यांचा टप्पा पार पाडला. महत्त्वाची बाब म्हणजे या स्काय वेमधून प्रवासाचा अनुभव घेणार्या देशभरातील एकूण प्रवाशांपैकी १५ टक्के प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. देशभरातील पर्यटकांना जलद आणि सुखद प्रवासाची अनुभूती देणार्या ‘धरमशाला स्काय-वे’ या प्रकल्पामुळे मेक्लोडगंज ते धर्मशाला ही वाट अतिशय सुकर झालेली आहे.
भारतातील काही अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणून ओळख मिळविलेल्या या ‘स्काय वे’मुळे पर्यटकांना धर्मशाला ते मेक्लोडगंज हा एरवी ३५ मिनिटांचा असलेला प्रवास आता केवळ ५ मिनिटांत पार करणे शक्य झालेले आहे. टाटा ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे ट्रील अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टाटा रिअॅल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर) तसेच पर्यटन विभाग आणि नागरी विमान वाहतूक विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा प्रकल्प उभा केला गेला आहे.
धरमशाला रोप वे लिमिटेडच्या संचालक नेहा पंडित म्हणाल्या, ही रोप वे परिवहन सुविधा देशभरातून धरमशालेला भेट देण्यास येणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. केवळ चार महिन्यांत एक लाख फेर्यांचा टप्पा ओलांडून आम्ही एक नवीन मापदंड प्रस्थापित केलेला आहे.
टाटासमूहाच्या कार्यक्षमतेवर, गुणवत्तेवर आणि सुरक्षाविषयक मानकांवर प्रवाशांनी दाखविलेला विश्वास यांचेच हे निदर्शक आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ परिवहन मिळवून देणारा हा रोप वे प्रकल्प टाटासमूहातर्फे युरोपियन सीईएन स्टँडर्ड्स वापरून बनवण्यात आलेला आहे.