राहुलच्या इच्छांचं यशस्वी मार्गक्रमण…

मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही, हा गैरसमज नवीन पिढीला तरी मान्य होणारा नाही. शिक्षण-शिक्षण आणि नोकरी-नोकरी एवढंच काय ते मराठी मुलांनी करायचं असतं, हा आजवरचा इतिहास. पण आता या परंपरेला आव्हान देण्याचं काम काही तरुण करताना दिसत आहेत.

बारामतीचा राहुल पाटणकर, सुशिक्षित घरातच मोठा झालेला. आजोबा मुख्याध्यापक आणि वडीलही नोकरीच करीत असल्यानं राहुलने शिकून कुठेतरी नोकरी करावी, एवढीच त्यांची इच्छा. घरात कोणी व्यवसाय करण्याचा कधी विचारच नाही केला. व्यवसाय करणं मराठी माणसाच्या ‘बस की बात’च नाही. एवढंच त्यांना माहिती होतं. त्यामुळं राहुलला इच्छा नसताना नोकरी करणं भागच पडलं. पण त्याच्या मनात कायम व्यवसायाचं वेड होतं. त्याला घरच्यांचे विचार पटत नव्हते. त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता, जे घरच्यांना बिलकूल नको होतं. शेवटी राहुलने त्यांच्या या पारंपरिक विचारांना आव्हान दिलंच.

शिक्षण पूर्ण झालं, की घरच्यांनी राहुलला एका कंपनीत जॉब लावून दिला होता. जॉब करीत असताना काही दिवसांनी राहुलने घरच्यांपुढं व्यवसायासाठी प्रस्ताव मांडला. मात्र त्यांनी तो अमान्य केला. जॉब सोडायचा नाही, असा घरच्यांचा पवित्रा होता. जिद्दी राहुलने घरच्यांचा शब्द तर पाळलाच, पण जॉब करीतच स्वतःचा व्यवसायही सुरू केला. मामाच्या मुलाला सोबत घेऊन सिमेंटपासून पाईप बनवण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला. ‘निष्णाई सिमेंट पाईप कंपनी’ व्यवसायाचं नाव. त्याच्या दाजींचा व्यवसायदेखील तोच असल्यानं राहुलला मोठ्या प्रमाणात यात मार्गदर्शन मिळालं. राहुलकडे कामासाठी सध्या आठ-दहा कामगार आहेत. बारामतीपासून पुण्यापर्यंत दररोज मोठमोठ्या ऑर्डर्स तो स्वीकारत असतो. वयाच्या तेविसाव्या वर्षी महिना लाखो रुपयांची उलाढाल राहुल करतोय. त्याला नोकरीची, सरकारी भरतीची कसलीही भ्रांत नाही. अजूनही एका खासगी कंपनीत नोकरी करीत तो अगदी उत्तमरीत्या व्यवसाय पुढे घेऊन जात आहे. वेळेबाबत कोणाकडे कसलीही तक्रार त्याने कधी केली नाही. व्यवसाय अगदी सुरळीत चालत असल्यानं घरचेही आनंदी आहेत.

‘मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही’ हा घरच्यांचा समज राहुलने दूरच केला. राहुलच्या यशस्वी व्यवसायामुळे त्याचे अनेक मित्र प्रेरित झाले आहेत. ‘इच्छा तिथे मार्ग’ ही म्हण राहुलने सिद्ध करून दाखविली. राहुलचा हा प्रवास अनेक मराठी तरुणांना मार्गदर्शक आणि प्रेरक ठरणारा आहे.

Dnyaneshwar: