पुणे : काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात बालगंधर्व ठिकाणी एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलेल्या होत्या. मात्र पुण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी इराणी यांच्या विरोधात आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी हात देखील उचलला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांना भोवलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांवर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेश हांडे, निलेश निकम, उदय महाले आणि रुपाली पाटील यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी योग्य तपास करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.