ठाकरेंचं पुढचं टार्गेट भरत गोगावले! शिंदे समर्थक आमदाराचा कट्टर विरोधक ‘मातोश्री’वर

मुंबई : (Snehal Jagtap Meet Uddhav Thackeray) शिंदे गटातील भरत गोगावले हे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा आमदार आहेत. २००९ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचा पराभव करुन ते आमदार झाले. त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांना आता यानिमित्ताने मिळणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर त्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्नेहल जगताप या कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांच्या कट्टर राजकीय विरोधक मानल्या जातात. त्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून महाडमधील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी त्या एक आहेत.

स्नेहल जगताप यांना चार ते पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं बाोललं जातं. अखेर दोन दिवसांपूर्वी जगताप-ठाकरेंची भेट झाल्याची माहिती आहे. स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार का, अशा चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र ही निव्वळ सदिच्छा भेट असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. परंतु २०२४ मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच ठाकरेंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय. स्नेहल जगताप या शिवबंधनात अडकल्या तर गोगावली यांची डोकेदुखी ठरणार आहे.

Prakash Harale: