मुंबई : काल आलिया आणि रणबीर यांनी आपल्या जवळच्या कुटुंबिय,आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नाची गाठ बांधली. त्यांनी सर्वांसमक्ष एकमेकांना साथ द्यायची वचनं दिली. हा सोहळा पार पडण्याआधी जितकी चर्चा रंगली होती,त्यापेक्षा अधिक चर्चा रंगलीय ती सोहळा पार पडल्यानंतर. कारणही तसंच आहे. आलियाचा भाऊ राहूल भट्ट म्हणाला की,”लग्नात वर-वधूंनी सात फेऱ्यांऐवजी केवळ चार फेरे घेतले आहे”. हे ऐकून मात्र सारेच विचारात पडलेयत. कारण परंपरेप्रमाणे लग्नाच्या विधीदरम्यान सात फेरे घेतले जातात,मग आलिया-रणबीरनं चारच फेरे का घेतले असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे.
यासंदर्भात उत्तर देताना राहुल भट्ट म्हणाला,” हे खूप इंट्रेस्टिंग होतं. आम्ही लग्नात सात फेरे पाहिलेच नाहीत. तिथे स्पेशल पंडित बोलावले होते. मी देखील त्या विधीत सामिल होतो जिथे भावाची आवश्यकता असते. कपूरांच्या घराण्याचे खास पंडित त्यांनी बोलावले होते. ते प्रत्येक फेऱ्याचं महत्त्व सांगताना म्हणाले,’एक फेरा धर्मासाठी,एक फेरा मुलांसाठी’… आणि दुसऱ्या दोन फेऱ्यांविषयी मी बोलू शकत नाही. ते थोडं सीक्रेट आहे. आमचं कुटुंबही अशा अनेक गोष्टींचं पालन करतं ज्या वंशपरंपरागत चालत आलेल्या आहेत. आणि या सगळ्याचं आम्हाला नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे कपूरांकडे सात फेऱ्यांऐवजी चार फेरे घेतात हे देखील आमच्यासाठी कुतूहलाचा,उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा भाग ठरलं. मी त्या चारही फेऱ्यांक्षणी तिकडे होतो”.