मुंबई : (Narayan Rane On CM Uddhav aThackeray Region) काल हाती आलेल्या राज्यसभेच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे.
दरम्यान, नारायण यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. राणे म्हणाले, तीन सीट जिंकणार म्हणत होते. पण काय झालं? राऊतही एका मताने काठावर विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दहा वर्षं मागे नेऊन ठेवला आहे. माविआ’चे आठ आमदार फुटतात, कुठे गेली तुमची विश्वासार्हता?
राष्ट्रवादीचे नेते शरद पवारजी यांनी जी प्रतिक्रिया दिली आहेत, त्यातून शिवसेनेनं बोध घ्यावा. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकी धर्म आहे. कुणाबद्दल तरी चांगलं म्हणा. ती तुमच्याकडून अपेक्षा नाही, कारण मला तुमचा स्वभाव माहित आहे. तुम्ही सत्तेसाठी लायक नाही, असं म्हणणार नाही, पण तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी पात्र नाही, असे राणे म्हणाले.