प्रथिनांनी समृद्ध सोयाबीन

शाकाहारी आहारामध्ये संपूर्ण प्रथिने असणारा दुधानंतरचा एकच पदार्थ म्हणजे सोयाबीन. अगदी डाळी, उसळीमध्येसुद्धा संपूर्ण नऊ अमायनो अ‍ॅसिड मिळत नाहीत. दूध, अंडी, मांस याहूनही भरपूर प्रथिने त्यात आहेत.

सोयाबीन अल्कली गुणाने समृद्ध आणि क्षारपूर्ण असल्याने वजन कमी करण्यासाठी, तसेच मांसपेशी वाढवण्यासाठी सोयाबीन उपयुक्त आहेत. सोयाबीनचे दूध अनेक आजारांत उपायकारक ठरते. सोयाबीनचे दाणे बारा तास पाण्यात भिजत टाकून त्याची साले काढावीत. पुन्हा पुन्हा स्वच्छ धुवून वाटून केलेली त्याची पेस्ट तिप्पट पाण्यात मिसळली जाते. नंतर मंद आचेवर सतत ढवळून हे दूध तापवतात. नंतर कपड्यातून गाळून गार करून साठवता येते. लहान मुलांना हे दूध गाईच्या दुधात मिसळून द्यावे. यातील ९० टक्के प्रथिने शरीरात शोषली जातात. दूध संपूर्ण पचते. आतडी स्वच्छ व कार्यक्षम राहण्यास हे दूध फार उपयोगी आहे. याचे दही तर उत्कृष्ट असून, चव, गंध या दृष्टीने डेअरीतील दह्यासारखे थोडे अधिकच चांगले असते.

अपचन, वयपरत्वे येणारा थकवा, मंदपणा यावर हे उत्तम आहे. सोयाबीनमधला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लेसिथिन. याचा एक थर आतड्यावर आतून येत असल्यामुळे अल्सर होत नाही. शिवाय काही महत्त्वाच्या अवयवात साठणारे कोलेस्टेरॉल व मेद तेथून काढून इतरत्र देण्याचे काम ते करते. शरीरातील सजीव पेशी कार्यक्षम करण्याचे कामही करते. मेंदूभोवतीच्या व मज्जारज्जूभोवती द्रवात ते असते. लेसिथिन सोयाबीनमधे भरपूर प्रमाणात असते. मधुमेही रुग्णांमध्ये सोयाबीनच्या पिठापासून बनवलेली कांजी किंवा पेज उपयुक्त असते. त्यामुळे एक ताजेतवानेपणा येतो. उत्साह निर्माण होतो व मूत्रातून जाणार्‍या साखरेचे प्रमाण कमी होते. त्वचेच्या तक्रारीमध्ये इसबसारख्या व्याधींवर सोयाबीन चांगले. मांस, अंडी, दूध यांच्या अनावश्यक वापराला त्यामुळे पायबंद बसतो.

तसेच लॅक्टोज इंटोलेरन्स असणार्‍या पेशंटमध्ये प्रथिनांची कमतरता सोयाबीनने भरून काढता येते. रक्तक्षय असणार्‍यांनी रुग्णांमध्ये सोयाबीन फायदेशीर ठरते. लोह भरपूर असल्याने सोयाबीन हे उत्तम आहार ठरू शकते. एखाद्या व्यक्तीचे पचन मंद असल्यास सोयाबीनचे दूध अथवा दही घ्यावे. सोयाबीनच्या पिठाचा वापर स्वयंपाकात करता येतो. गव्हाच्या पिठापेक्षा हे अनेकपटीने पौष्टिक आहे. त्यात गव्हाच्या १५ पट कॅल्शियम, सातपट फॉस्फरस, दहापट लोह, दहापट थायमिन आहे.

जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

Nilam: