माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना निर्देश

मुंबई : (Special Protocol to Chief Minister Convoy) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री या नात्यानं सतत महाराष्ट्रभर प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतुक पोलिसांकडून प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येतं. त्यामुळं जवळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसंच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जातात. यामुळं पोलीस दलावर देखील कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आलं.

दरम्यान, शिंदे म्हणाले, या व्यवस्थेमुळं लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको यामुळं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नसेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.

यापुढं, मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. वाहतूक कोंडीने त्रासलेल्या सर्वसामान्य वाहनचालकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Prakash Harale: