संकुल उच्चभ्रूंसाठी की, गरिबांसाठी?
येरवडा : पालिकेच्या वतीने नागपूर चाळ येथे उभारण्यात आलेले क्रीडा संकुल विविध समस्यांच्या विळख्यात अडकले असले तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारण्यात आले की, उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांसाठी हा मुख्य प्रश्न स्थानिक नागरिकांना सतावत आहे.
शहराचे प्रवेशद्वार म्हणून येरवडा भागाकडे पाहिले जात असल्यामुळे व परिसरात खासगी कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकसंख्येचा विस्तारदेखील झपाट्याने वाढत आहे. या भागात खासगी जलतरण तलाव, व्यायामशाळा आदी सुविधा खासगी व्यावसायिक धारकांनी उभारला असला तरी त्यांचे असणारे दर मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे नागरिक विविध सुविधांपासून वंचित राहत होते. नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन पालिकेच्या वतीने कोट्यवधी खर्च करून नागपूर चाळ येथे टोलेजंग इमारत उभारून परिसरात क्रीडा संकुल उभारले.
जलतरण तलावासह टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, क्रिकेट प्रशिक्षण, तिरंदाजी, व्यायामशाळा खेळांची सुविधा पालिकेच्या वतीने करण्यात आली असली तरी नागरिक सुविधांपासून अद्यापही वंचित असल्याचे दिसून येत आहे. संकुलात प्रवेश केल्यावर खेळांना प्राधान्य देण्याची गरज असताना परिसरात पालिकेच्या वतीने एक शॉप सायकल विक्रेत्यास दिल्याने पालिका अधिकारी व संबंधित दुकानदार यांचा मनमानी कारभार उजेडात आला आहे. कोणत्या नियमानुसार संबंधित दुकान विक्रेत्यास देण्यात आले आहे, अशी शंका परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
समाजातील गरजवंत व गोरगरीब नागरिकांच्या सुविधेसाठी असणारे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. पण याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नसेल तर फायदा काय? त्यामुळे पालिकेने क्रीडा संकुलासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला असल्याचे स्पष्ट होत आहे.
— महेश पाटील, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी माथाडी व कामगार जनरल युनियन
विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी जलतरण तलाव जरी बांधण्यात आला आहे, पण जलतरणपटूंच्या सुरक्षेसाठी त्यालगत लोखंडी जाळ्या बांधण्यात आल्या आहेत. पण त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने कापडाची जाळी लावण्यात आली नाहीत. त्यामुळे जलतरण तलाव खुला आहे. महिला आणि मुले सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याच प्रकारे उपाययोजना करण्यात न आल्याने पालिका अधिकारी व ठेकेदार हे जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. तर त्यालगतच दुसरा असा २५ ते ३० फूट खोलीचा तलाव बांधण्यात आला आहे. पण त्यामध्ये पाणीच नसल्यामुळे अनेक जलतरणपटू तेथे खेळण्याचा आनंद लुटू शकत नाही. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून, तलावाखालून जाणाऱ्या ड्रेनेज लाईनचे पाणी तलावात साचत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून नागरिकांना आरोग्याचा मुख्य प्रश्न सतावत आहे.
क्रीडा संकुलाचे टेंडर पालिका अधिकाऱ्यांच्या हातात देण्यात आल्यामुळे ठेकेदार व अधिकारी यांच्यामध्ये ते घेण्या-देण्याकरिता लाखो रुपयांची अर्थपूर्ण चर्चा आहे. क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांचा संपर्क होत नसल्याने न्यायासाठी जनतेने आता कोणाची दारे ठोठवायची हा प्रश्न आहे.