जालना | Manoj Jarange Patil : सध्या मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजानं आता राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच आता पाणी पिऊन साखळी उपोषण करा, कुणाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असले, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) दिला आहे.
उद्यापासून ज्यांना शक्य आहे त्यांनी आमरण उपोषण करावं. तसंच इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे. तसंच या उपोषणादरम्यान कोणाला काही झालं तर त्याची जबाबदारी सरकारवर असले, असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
आता गावागावात राजकीय नेत्यांना बंदी करा. ते इकडे येऊन करणार तरी काय आहेत. आमदारांनी मुंबईमध्ये जाऊन मराठा आरक्षणावर आवाज उठवावा. कारण आमची मुलं मरत आहेत, तुम्ही मजा बघू नका. जरा गांभीर्यानं घ्या, अन्यथा तुम्हाला हे झेपणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगेंनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू केलं आहे. यापुढे ते अन्न, पाणी, उपचार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.