संधी समजून सोनं करता आलं पाहिजे

“स्त्रियांनी जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून न जाता जबाबदारीला संधी समजून तिचं सोनं करायला पाहिजे” : निशा होदाडे

योग्यरीत्या जबाबदारी पार पाडण्याची शिकवण घर चालवणार्या स्त्रीकडूनच मिळते. अनेकवेळा स्त्रियांना घर चालवण्याच्या बाबतीत दुय्यमच स्थान असलेलं आपल्या समाजात तरी दिसतं. घरातील कर्ता – धर्ता म्हणून पुरुषांनाच गणलं जातं. मात्र याला काही स्त्रिया अपवाद देखील दिसतात. आपल्या पतीच्या बरोबरीनं किंवा पती पेक्षाही जास्त जबाबदार्या त्या स्विकारतात.

पुण्यातील निशा होदाडे या अशाच जबाबदार स्त्री म्हणून उत्तम उदाहरण सांगता येतील. घराची जबाबदारी फक्त पतीवर न टाकता त्यांनी स्वतःवर सुद्धा घेतली. जबाबदारीला संधी समजून त्यांनी नवीन स्टार्टअपच सुरू केलं. पुणे – नाशिक रोडला असलेल्या चाकण बालाजीनगर इथल्या मेदनकरवाडी – लेडीज टेलरचं शॉप सुरू केलं. लेडीज टेलर म्हटल्यावर ते तर पाऊला पाऊलावर असतात. मात्र निशा यांची वेगळीच खासियत आहे.

तीन वर्षांपूर्वी त्या एका कंपनीत नोकरी करत. मात्र नोकरीमुळं त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला कमी वेळ मिळत होता. तेव्हा त्यांनी घरूनच काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी शिलाई मशीन शिकायला सुरुवात केली. लेडीज टेलर आजूबाजूला अनेक आहेत याची त्यांना कल्पना होती. त्यामुळं कस्टमरला इतरांपेक्षा वेगळ्या डिझाईन द्यायचा त्यांनी निर्धार केला. आणि वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याची माहिती ऑनलाइन मिळवली आणि जोरात प्रॅक्टिस सुरू केली.

वर्षभरात अनेक प्रकारच्या डिझाईन त्यां शिकल्या. जसंजसं ग्राहकांना याबाबत माहिती व्हायला लागली त्यांचा व्यवसाय भरभराटीला लागला. त्यांनी शिवलेल्या ब्लाऊज, लेडीज ड्रेस च्या डिझाईनची चर्चा परिसरात व्हायला लागली. सध्या त्यांचं ‘तेजल लेडीज टेलर’ हे अनोख्या देखण्या डिझाईन मुळेच परिसरात प्रसिद्ध आहे.

Dnyaneshwar: