रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

पुणे blood donation news | जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीला राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष व १४ जूनच्या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषद यांच्या माध्यमातून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी ३ ते ६ या वेळेत राज्यभरातील नियमित रक्तदान करणारे शतकवीर रक्तदाते, नियमित शिबिर संयोजक संस्था, गणेश उत्सव मंडळे व कंपनी त्याचप्रमाणे प्रभावी काम करणार्‍या रक्त केंद्रांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रसाधन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील येडगावकर, आरोग्य विभाग सचिव प्रदीप व्यास, अरुण थोरात, रामास्वामीजी, आदी उपस्थित होते. स्वेच्छा रक्तदान संकलनात महाराष्ट्र सातत्याने क्रमांक १ राहत असल्याने सर्व मान्यवरांनी महाराष्ट्रातील सर्व रक्तदाते शिबिर, संयोजक व रक्त केंद्रांचे भरभरून कौतुक केले. हे कार्य असेच पुढे चालू राहून रक्ताविना कोणीही मृत्युमुखी पडणार नाही अशी रचना आपण लावावी, असे आवाहन माननीय मंत्र्यांनी केली. रक्तासोबत रक्त गुणवत्ता व रक्तघटक याचा प्रभावीपणे उपयोग करावा असे सुचविले गेले. कार्यक्रमात ९० हून अधिक व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

कोविडसारख्या कठीण काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करून रुग्णांची उत्तम सेवा केल्याबद्दल जनकल्याण रक्त केंद्र पुणे यांचा सन्मान करण्यात आला. स्वेच्छा रक्तदान चळवळीत ही रक्तपेढी अग्रेसर राहिली आहे. सुरवातीपासूनच स्वेच्छा रक्तदान हाच आग्रहाचा मुद्दा ठेउन, पैश्याच्या अथवा अन्य कोणत्याही मोबदल्यात रक्त संकलित न करता किंवा तत्सम कुठल्याही तडजोडी न करता जनकल्याण रक्तपेढी रक्त संकलन करीत आली आहे.

Dnyaneshwar: