चार दिवसांपूर्वीचे गद्दार पद, प्रतिष्ठेसाठी खुद्दार होतात. संदीप पाटील या विरोधात लढले, बहोत खूब! ही लढाऊ पाटीलकी कायम राहू दे!
भारतीय क्रिकेट संघामध्ये संदीप पाटील यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, चेतन चौहान यांसारख्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तासन् तास गोलंदाजांना घाईला आणणाऱ्या फलंदाजांच्या कालखंडात झंझावात निर्माण करणारा क्रिकेटपटू म्हणून संदीप पाटील यांनी आपले नाव भारतीय क्रिकेट संघात नोंदवले. ‘लढवय्या आणि बेडर वृत्तीचा खेळपट्टीवरचा क्रिकेटपटू’ या ओळखीबरोबरच त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाग घेऊन केवळ गोलंदाजांनाच घाईला आणतो असे नाही, तर दिग्गज राजकीय मंडळींबरोबर दोन हात करण्यास तयार असल्याचे दाखवून दिले. संदीप पाटील याने हिंदी चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका केली आणि त्यातील बोल्ड सीनबद्दल तो गाजला होता. थोडक्यात, बेधडक, बिनधास्त, आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी संदीप पाटील यांची ओळख आहे. सहा चेंडूंवर सहा चौकार सलग मारणारा कसोटीवीर ही पण त्याची महत्त्वाची ओळख. थोडक्यात, आव्हानांना सामोरे जाणे आणि त्यांच्याशी मुकाबला करणे हे त्याच्या रक्तात आहे.
राजकारणात असा समोरासमोर थेट मुकाबला केला जात नाही, हे माहीत असून त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची लढवलेली निवडणूक कौतुकास्पद! क्रीडा संघटनेच्या संचालकांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय मंडळींनी बस्तान बसवणे हा आता राजकीय संस्कृतीचा भाग झाला आहे. या खेळाशी त्यांचा थेट संबंध आला असो वा नसो. अनेकांना खेळवण्यात राजकारणी मंडळींना खूप स्वारस्य असते आणि ज्या खेळांना ग्लॅमर आणि पैसा जोडला गेला असेल, तर तो त्यांचा वडिलोपार्जित हक्क असल्याचा आव असतो. याला मोदी सरकारने काहीसा छेद देण्याचा प्रयत्न केला आणि राजवर्धनसिंह राठोड या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूला केंद्रीय क्रीडामंत्री नेमले. हा दृष्टिकोन राजकारण्यांनी ठेवला पाहिजे. खेळाडूंचे व्यवस्थापन आणि त्यांच्या सोईसाठी त्या खेळांमध्ये काम केलेल्या मंडळींनाच संघटनांच्या संस्थेच्या महत्त्वाच्या जागांवर नेमले पाहिजे.त्यांना पूर्ण स्वायत्तता दिली पाहिजे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये क्रिकेटपटू विजयी झाला असे गेल्या काही वर्षांत झालेले नाही. याचे महत्त्वाचे कारण राजकारणी मंडळींनी त्यात केलेला मोठा हस्तक्षेप आहे.
आता ही परंपरा सहजासहजी खंडित होईल असेही वाटत नाही. त्यामुळे साहजिकच क्रिकेटपटूंनी अशा संघटनांमध्ये निवडणुकांसाठी उभे राहणे बंद करावे. खेदाची बाब ही आहे, की राजकीय वैमनस्य असणाऱ्या आणि परस्परभिन्न विचारधारा घेऊन समाजकारण जगणाऱ्या मंडळींना सत्ता, पैसा, प्रतिष्ठान याकरता कुठेही आणि कशीही कोलांटउडी मारण्यास काहीच वाटत नाही.चार दिवसांपूर्वी एकमेकांना गद्दार म्हणणारे चार दिवसांनंतर खुद्दार होतात ही एकूणच सामाजिक जडणघडणीची शोकांतिका आहे. संदीप पाटील या विरोधात लढले, बहोत खूब! ही लढाऊ पाटीलकी कायम राहू दे!
-मधुसूदन पतकी