शिवसेना जोपर्यंत भाजपबरोबर होती तोपर्यंत मनसेला भाजपचे दरवाजे बंद होते. भलेही भाजपच्या अनेक नेत्यांचा छुपा पाठिंबा होता. पण आज शिवसेना काँग्रेसच्या जवळ गेल्यानंतर मनसेला किंवा राज ठाकरे यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नाही.
तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या, अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार, अस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे वाक्य वाचले आणि मला ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पडल्यानंतर ’जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे,’ या देशाला हलवून टाकणार्या वाक्याची आठवण झाली.
त्याआधी १९८७ मध्ये विलेपार्ले पोटनिवणुकीसाठी बाळासाहेबांनी ’गर्व से कहो हम हिंदू है’ असा नारा दिला होता. तेव्हाचे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांना बाळासाहेबांच्या प्रभावाची कल्पना आली आणि जनता दल, शेकापकडून लाथाडल्या गेलेल्या भाजपने १९८९ मध्ये शिवसेना-भाजप युती केली. त्याच वर्षीच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आपले भाषण सुरू करण्याच्या आधी आद्य सरसंघचालक स्व. डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक स्व. गोळवलकर यांचे स्मरण करून आपल्यातील हिंदुत्वाची चुणूक दाखवून दिली.
राज यांची एकूण राजकीय वाटचाल पाहिली तर ते अगदी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून जात आहेत, असे लक्षात येईल. बाळासाहेबांना शिवसेना स्थापनेपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (स्व.) वसंतराव नाईक यांनी कामगारजगतातील कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव रोखण्यासाठी छुपी मदत केली. आचार्य अत्रे शिवसेनेला वसंतसेना म्हणायचे यातच सारेे आले.
पुढे याच बाळासाहेबांनी विरोधी पक्षातील काँग्रेसच्या मुरली देवरांना मुंबईचे महापौरपद दिले आणि त्या बदल्यात तीन शिवसेनानेत्यांची वर्णी विधानपरिषदेवर लावली. त्यातील एक माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी. १९८९ ला बाळासाहेबांनी भाजपचा हात धरला. ज्याला ते अनेक वेळा त्यांच्या ठाकरी स्टाईलमध्ये कमळाबाई म्हणत तो मरेपर्यंत कायम ठेवला. बाळासाहेबांना काँग्रेसने गुप्तपणे मदत केली आणि पुढे त्यांच्याशी युतीही केली आणि ते इंदिरा गांधींना भेटूनही आले.
राज यांची राजकीय कारकीर्द तशीच आहे. तेही सोनिया गांधींना भेटून आले. बाळासाहेबांनी दक्षिण भारतीयांविरुद्ध आवाज उठवला, तर राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध. २०१९ च्या निवडणुकीत ’लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी मोदी-शाह यांच्याविरुद्ध काँग्रेसला मदतच केली. पण आता माझ्या दृष्टीने राज त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक आणि महत्त्वाची खेळी खेळत आहेत. भाजपला १४५ चा आकडा गाठण्यासाठी छोट्या पण प्रभावी पक्षाची गरज आहे, तर लागोपाठच्या दोन निवडणुकांत प्रत्येकी एक आमदार निवडून आणणार्या राजना एका मोठ्या आधाराची. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरला, त्यामुळे राज यांचा तो मार्ग बंद झाला आणि त्यांना भाजपशिवाय पर्याय उरला नाही. राम मंदिरनिर्मितीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने सोडवल्यानंतर आता हिजाब, मशिदींवरील भोंगे अशा धार्मिक भावनांना हात घालणारे विषय हातात घेण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. कर्नाटकात हिजाबच्या नावाने धुमाकूळ घातल्यानंतर मशिदींवरील भोंग्यांचा विषय भाजपने राज यांच्याकडे दिलेला दिसतो. पाहुण्यांच्या हातून साप मारून घेण्याचा प्रकार! भाजप यात वाकबगार आहे.
प्रथम समाजवाद्यांच्या खांद्यावर बसून मोठ्या झालेल्या भाजपने नंतर समाजवाद्यांनाच संपवले. पुढे त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. पण अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास नकार दिल्याने त्यांची युती तुटली. बाळासाहेबांची वक्तृत्वशैली आणि अचूक टायमिंग लाभलेल्या राज यांनी अखिल भारतीयस्तरावर येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवावेत, असा इशारा देत तसे न झाल्यास मशिदींसमोर दिवसातून पाच वेळा हनुमान चालिसा म्हटली जाईल, असा इशारा दिला आहे. नमाज दिवसातून पाच वेळा पढली जाते, म्हणून हनुमान चालिसा पाच वेळा आणि हिंदी बेल्टमध्ये हनुमान चालिसा पाठ नाही, असा हिंदू सापडणार नाही आणि नेमका त्या स्तोत्राचा उल्लेख करून राज यांनी उत्तर भारतीय किंवा हिंदी बेल्टमध्ये स्वत:ची हिंदुत्ववादी म्हणून इमेज तयार केली.
सुमारे दोन दशकांपूर्वी याच हिंंदी भाषिकांच्या विरुद्ध आणि हम तो हिंदी में बात करेंगे असे म्हणणार्या जया बच्चन यांच्याविरुद्ध राडेबाजी आणि बहिष्काराची भाषा त्यांनी केली होती. पण आज परिस्थिती बदलली आहे. भाजपचा खरा बेस उत्तर भारतात आहे.
राम मंदिर आणि भाजप यांचे अविभाज्य नाते आहे. त्यामुळे राज यांनी जाणिवपूर्वक रामभक्त हनुमानाच्या स्तोत्राची निवड केली असावी, असे वाटते. यामुळे संघपरिवाराच्या बजरंग दलाच्या सध्या तथाकथित गोरक्षणाशिवाय कोणतेही काम नसणार्या या तथाकथित गुंडांना एक काम मिळवून दिले. जणू काही रामभक्त हनुमान तसे भाजपभक्त राज!
मंदिरे वा मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा कोणाताही आदेश नाही. परवानगीने भोंगे लावण्यात आले
असतील तर ते काढण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. फक्त वेळ आणि आवाजाचे बंधन पाळावे लागेल, ही वस्तिु्थती आहे. केवळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे वाजविण्यास बंदी घातली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या कळपात गेल्यापासूनच राज ठाकरेंनी भगवेकरणास सुरुवात केली होती. आपल्या पक्षाच्या ध्वजाचा रंग पूर्ण भगवा केला आणि त्यावर शिवाजीमहाराजांच्या राजमुद्रेचा उल्लेख केला आणि हिंदुत्वाची कास धरत भाजपशी युती करण्याचा एक मार्ग उघडला. पक्ष स्थापन केल्यापासून राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत केलेला हा चौथा बदल.
मुंबईच्या पत्रकारसृष्टीतील बाळासाहेबांना विरोध करणार्या समाजवादी आणि साम्यवादी पत्रकारांनी प्रथमपासूनच राज यांचे गोडवे गाण्याचे काम सुरू केले होते. ते आजही सुरू आहे. कदाचित ते राज यांना बाळासाहेबांचा भविष्यातील पर्याय म्हणून पाहत असावेत आणि राज यांचे प्रथमपासून लक्ष होते शिवसेनाप्रमुखपदावर. २००९ च्या विधानसभेत राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३ आमदार निवडून आले होते. पक्ष स्थापन केल्यापासून अवघ्या तीन वर्षांच्या आत राज आणि त्यांचा पक्ष राज्यातील पाचवी शक्ती म्हणून उदयास आले होते. २००९ ला जरी राज यांनी कुणाशीच युती न करता निवडणूक लढवली असली तरी गुप्तपणे उद्धव ठाकरेंवर नाराज असणारे अनेक भाजपचे नेते राजना मदत करत होते.
भाजप आणि मनसेच्या जवळिकीचा परिपाक म्हणूनच की काय, राज आपल्या १३ आमदारांच्या बरोबर २०११ ला चक्क गुजरात दौर्यावर गेले होते आणि मोदींनी केलेल्या विकासाची त्यांनी तोंडभरून स्तुती केली होती. इतकेच नव्हे, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर त्यावेळचे भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी ’न मागता दिलेला पाठिंबा’ असे म्हणत त्यांची खिल्लीही उडवली होती. पण उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले सर्वच भाजपनेते आपला भविष्यातील साथीदार म्हणून राज यांच्याकडे पाहत होते.