मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्यात दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे आज शेअर बाजारात जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसून आली. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 555.75 अंकांच्या तेजीसह 65,387.16 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) हा 181.50 अंकांच्या तेजीसह 19,435.30 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 44 कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा एल अॅण्ड टी, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर दुसरीकडे एनटीपीसीच्या शेअर दरात पाच टक्क्यांची तेजी दिसून आली.
आजच्या व्यवहारात मेटल्स क्षेत्रातील स्टॉक्समध्ये चांगली तेजी दिसून आली. जेएसडब्लू स्टील आणि टाटा स्टीलच्या दरात 3 टक्क्यांची तेजी दिसून आली. मारुती सुझुकीच्या शेअर दरात खरेदी दिसून आली. बँकिंग आणि आयटी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.