जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे राज्यातील राजकारण पेटताना दिसत आहे. काही ठिकाणी आक्रमक प्रचार होताना दिसत आहे. या आक्रमक प्रचाराचा प्रत्यय आज हिंगोलीमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये हिंगोलीत प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय घडले नेमके?
हिंगोलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफे यांनी दिली आहे. हिंगोलीत कळमनुरी तालुक्यात ही घटना घडली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी संबंधित गाड्या या वाकोली गावात पोहोचल्या होत्या. यावेळी प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर जोरदार दगडफेक झाली.या घटनेनंतर कळमनुरी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. ठाकरे गटाच्या गाड्यांवर दगडफेक करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.