सिनेमाचं जग हे जितकं सुंदर तितकंच काटेरी… प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी तिथं जाण्याची तीव्र इच्छा, मोह हा होतोच. या मायावी नगरीच्या वेडापायी अनेकजण आयुष्यातून उठले. पण कित्येकांची आयुष्यं घडलीदेखील… पण हा आकडा फारच छोटा आहे. इथे प्रत्येकाला शाहरुख नि माधुरी व्हायचं असतं. इथे प्रत्येकाची ’मन्नत’ जुहूला स्वतःचा बंगला असावा अशीच असते. पण ही वाट वाटते तितकी सोप्पी तर नसतेच, उलट काट्याकुट्यांनी भरलेली असते.
विशेषतः महिलांसाठी तर इथे पावलापावलावर जणू लांडगेच दबा धरून बसलेले असतात. जे कायम सावजाच्या शोधात असतात. असं असताना इथली प्रत्येक कथा ही प्रचंड वेदना पोटात घेऊन पूर्ण झालेली असते. इथल्या प्रत्येक पात्राची निराळी कथा. निराळं जगणं. कधी हेवा वाटावं असं, तर कधी किळस यावं असं. हे सगळं असलं तरी या जगाचा मोह काही सुटत नाही. मग इथे घडत राहतात काळीज कुरतडून टाकणार्या कथा. ज्याचा मागमूस कोणाला लागत नाही. एखादेच श्रीकांत धोंगडे ज्यांची उभी हयात या झगमगाटाच्या क्षेत्रात गेली त्यांना या घटना दिसतात आणि भावतात, मग तयार होतात ’कुरतडलेल्या कथा’.
कुरतडलेल्या कथा हा डॉ. श्रीकांत धोंगडे यांचा कथासंग्रह. यातील प्रत्येक कथा मनात घर करतेच, पण प्रचंड अस्वस्थदेखील करते. कारण यात दाखवलेलं वास्तव हे सिने जगताचं कटू सत्य आहे. किंबहुना ती या जगताची दुसरी, पण काळी बाजू आहे.
इथली नाती, इथले व्यवहार यांच्या भावना या सगळ्या पैशांवर ठरतात. इथे प्रेम, ममता, भावनिक ओलावा यांना जणू स्थानच नाही. लेखकाने या सगळ्या कथांना अगदी वास्तव पातळीवर नेऊन ठेवले आहे. या कथा कुठेही सिनेमासारख्या खोट्या वाटत नाहीत, जरी त्या या जगातीलच असल्या तरी. त्यातील घटना, पात्र आपण पाहिलेलीच आहेत हे सातत्याने आपल्याला जाणवत राहते. असं म्हणतात, काळ्याकुट्ट ढगालाही सोनेरी किनार असते, पण या झगमगाटाच्या क्षेत्राला काळीकुट्ट किनार आहे. इथल्या कलाकारांचं मुखवटा लावून जगणं, मुखवट्याआडचे त्यांचे दुःख हे सगळं या कथांमध्ये दडलेलं आहे. गुरुदत्त, अमृता प्रीतम, साहिर इमरोज यांचा प्रेमाचा त्रिकोण, मीनाकुमारी यांचं आयुष्य या आणि अशा अनेक लोकांच्या कथा आपलं काळीज कुरतडतात. कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच कमालीचे आकर्षण असते. त्यामुळे या कथा वाचताना आपण त्यांच्या आयुष्याशी समरस होतो. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील या कहाण्या नक्कीच तुम्हाला आवडतील.
पुस्तकाचे नाव – कुरतडलेल्या कथा
लेखक – श्रीकांत धोंगडे
किंमत – रु. २००/-
प्रकाशन – काँटिनेंटल
अश्विनी धायगुडे-कोळेकर