विद्यार्थी लसीकरणासाठी तयारी सुरू

औरंगाबाद : दीड महिन्यानंतर १३ जूनपासून प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू होत आहेत. या कालावधीत राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याचे संकेत राज्य शासन, प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. चौथ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका राहील, असा अंदाजही वर्तविला जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मुलांच्या लसीकरणासाठी नियोजन केले आहे.

जिल्ह्यात १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणाला सुरवात झालेली आहे. शाळांमध्ये एकाच वेळी सर्वच मुलांना लस देणे सोयीचे झाले होते. मात्र महिना, दीड महिन्यांनी शाळा बंद झाल्याने मुलांच्या लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. आता शाळा सुरू होत असल्याने, आरोग्य विभागानेही लसीकरणाची तयारी सुरू केली असून, पथके नियुक्त केली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली आहे. जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील ग्रामीण भागातील ९२ हजार ९८३ तर शहरातील ४५ हजार २५५ असे एकूण १ लाख ३८ हजार २३८ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

आतापर्यंत ७८ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तसेच यापैकी २५ हजार ५९८ जणांचा दुसरा डोस झालेला आहे. पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे केवळ ५७ टक्के झालेले आहे. शाळा सुरू झाल्याने हे प्रमाण वाढेल, असे डॉ. शेळके यांनी सांगितले.

Nilam: