विद्यार्थ्यांनी प्रगल्भ असणे आवश्यक : पाटील

विद्यार्थ्यांनी करिअरबाबतीत सजग राहात योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे असून, अनेकवेळा योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे आपण अनेक संधींना मुकतो. त्यामुळे वाचन व आलेल्या अनुभवाने आपल्या उणिवा जाणून घेत स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे.

जीवनाचे ध्येय निश्चित करा : अ‍ॅड. संदीप कदम
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच आपले ध्येय निश्चित करण्याचे आवाहन करीत काळानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच ‘मोर ओडिशा डायरी’ हे पुस्तक वाचताना आलेला अनुभव कथन करत या उपक्रमातून भावी अधिकारी घडतील, असा आशावाद व्यक्त केला. भरपूर वाचा, मनन करा, चिंतन करून मग लिखाण करा, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना लेखनामध्ये नेटकेपणा यायचा असेल तर लिखाणाचा सराव ठेवा, असे सांगितले.

पिंपरी : आत्मपरीक्षणातून विकासाची नवीन दिशा मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करत भविष्याच्या दृष्टीने प्रगल्भ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

‘मोर ओडिशा डायरी : आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सहा. आयुक्त अण्णा बोदडे, उपप्राचार्य डॅा. लतेश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या नावीन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना व महत्त्व स्पष्ट करत अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल, असे मत व्यक्त केले.

‘मोर ओडिशा डायरी : आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतीय प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश पाटील यांनी आर्थिक स्थिती हलाखीची असताना देखील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तसेच ओडिशा राज्यामध्ये काम करत असताना दुर्गम व आदिवासी भागामध्ये आलेली आव्हाने, स्थानिक प्रश्न याविषयी माहिती देताना मयुरभंज जिल्ह्यामध्ये वंचित घटकांना
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गत केलेल्या ‘मु बी पडीन’ या अभियानावर प्रकाश टाकला.

Prakash Harale: