मुंबई : (Subramanyam Swamy On Election Commission) शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हावर निकाल देण्यात घाई केली आहे. आयोगाचा हा निकाल अन्यायकारक असून केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि त्यावरील नियुक्त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. त्यांच्या या मागणीला भाजप माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे एकप्रकारे भाजपला घरचा आहेर मिळाल्याचं बोललं जात आहे.
सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच आपल्या पक्षविरोधी निधानं आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. एवढच नाहीतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही अनेकदा परखड मत व्यक्त केलेलं आहे. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या निर्णयासही त्यांनी पाठिंबा दर्शवल्याने, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
”मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण, त्यांचा कार्यकाळा अर्थमंत्रालयात संशायस्पद होता.” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा करीत निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची मागणी केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात शिंदे यांची मागणी मान्य करीत शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा आदेश दिला.
त्यामुळे संतापलेल्या ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. आणि निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा विरोधकांचा पूर्वनियोजित कट असून अशीच परिस्थिती उद्या अन्य पक्षांवरही आणू शकतात. त्यामुळे सन २०२४ची लोकसभा निवडणूक ही देशातील कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.