सक्सेस स्टोरी : शेतकर्‍याचं पोर झालं शास्त्रज्ञ

बालाजी धनाजी जाधव याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. बालाजी याचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण येथील मराठी शाळेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेऊन त्यांनी पुढील शिक्षणासाठी सोलापूर ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, तर उच्च शिक्षण पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केले. जिद्द, चिकाटी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात.

मित्रपरिवाराचे मोलाचे सहकार्य आणि आई-वडिलांनी कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही, असे बालाजी जाधव याने सांगितले. २०२१ मध्ये बालाजी याची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्रीय कंपनीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून निवड झाली. यानंतर ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी काम केले. आता त्याची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सध्या तो तिरुअनंतपूरम येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम पाहत आहे.

आयुष्यात काहीतरी बनण्याचे माझे स्वप्न होते. ती जिद्द मी मनाशी बाळगली, तसेच माझ्या आई-वडिलांनी गरीब परिस्थितीतून माझे शिक्षण पूर्ण केले. तसेच मी अहोरात्र अभ्यास करीत स्पर्धा परीक्षा दिली. यामध्ये मी उत्तीर्ण झालो. गेट परीक्षा देऊन यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसल्याने ते स्पर्धा परीक्षांपासून अलिप्त राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा द्यावी व आपले भविष्य घडवावे. मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन करेन !

_बालाजी जाधव, शास्त्रज्ञ

मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील बालाजी धनाजी जाधव याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (आय. एस. आर. ओ.) म्हणजेच ‘इस्रो’ मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. एका शेतकर्‍याच्या मुलाने थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय झाला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बालाजी जाधव याचे प्राथमिक शिक्षण कुरुल जि. प. प्रा. शाळेत व माध्यमिक शिक्षण रयतच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. बारावीत ए.डी.जोशी महाविद्यालयात ८९ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. उच्च शिक्षण पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शेवटच्या वर्षात असताना सेटची परीक्षा दिली; परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. यावेळी मात्र सेटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

पुढील काळात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवले आणि २०२१मध्ये बालाजी जाधव यांची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्रीय कंपनीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपेक्षित यश मिळाल्याने बालाजी जाधव यांची भारतीय अंतराळ संस्थेमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये बालाजीची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड केंद्रीय कंपनीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून निवडून झाली.

दै.राष्ट्रसंचारशी बोलताना बालाजी म्हणाले की, आपल्याला चांगली नोकरी मिळाली आहे तरीसुद्धा आपण इथपर्यंत न थांबता यापेक्षाही मोठे काहीतरी झालं पाहिजे म्हणून अभ्यास सुरू ठेवला आणि दिलेल्या परीक्षेमध्ये जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बालाजीची भारतीय अंतराळ संस्थेमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली.एका सामान्य गरीब कुटुंबातील शेतकर्‍याचा मुलगा आज तिरुअनंतपुरम येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. ही कुरुलवासीयांसाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट असून त्याच्या यशाबद्दल बालाजीचे व त्याचे वडील धनाजी जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Dnyaneshwar: