पुण्याच्या डॉ. प्रचीती मिसेस युनिव्हर्सच्या स्पर्धेत

पुणे : पुण्याच्या डॉ. प्रचीती पुंडे येत्या २२ जून रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे होणार्‍या मिसेस युनिव्हर्स २०२२ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेत ९० देशांच्या स्पर्धक भाग घेणार असून डॉ. प्रचीती या भारताचे प्रतिनिधित्व
करणार आहेत.

याआधी त्या मिसेस पुणे २०१९, मिसेस इंडिया २०२० आणि मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलेशिया २०२१ च्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, पुणे ते सेऊल हा प्रवास उलगडला. ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येऊन त्यांनी एम. बी. बी. एस.ची पदवी घेतली. त्या पुण्यातील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ असून त्यांची स्वतःची प्रचीती कोकोरो ही जीवन प्रशिक्षण देणारी संस्था आहे.

आयुष्यातील ‘लाईफ कोचिंग’चे महत्त्व जाणून याच माध्यमातून हजारो महिला-मुलींना आत्म-निपुणतेचे धडे देऊन घडविले आहे. जीवन प्रशिक्षणावर संपूर्ण महाराष्ट्रात डॉ. पुंडे यांची ३५० हून अधिक व्याख्याने झालेली आहेत. शहरात येऊनदेखील ग्रामीण भागाशी जोडलेल्या प्रचीती यांची गेल्या १८ वर्षांपासून करमाळा तालुक्यात अभिजिता महिला हस्तकला केंद्र ही स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेद्वारे त्या ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. ज्यूटपासून विविध वस्तू बनवणे, बंजारा भरतकाम, म्युरल वर्क स्टेन वुड इत्यादी कलांच्या प्रशिक्षणाद्वारे महिला व मुलींना आर्थिकदृष्ठ्या स्वावलंबी बनवण्याचे कार्य त्या करतात.

मला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड आहे. तसेच ३५० हून अधिक सेमिनार घेतले आहेत. मी जेव्हा क्राऊन जिंकला तेव्हा माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला. मी ग्रामीण भागात १८ वर्षे काम केले आहे. तसेच करमाळा ते कॅलिफोर्निया असा प्रवास केला आहे. त्यामुळेच मी मिसेस युनिव्हर्स २०२२ या स्पर्धेत सहभागी होत आहे.

_डॉ. प्रचीती पुंडे (मिस इंडिया)

डॉ. पुंडे या ‘सशक्त भारत कुशल भारत’ या पंतप्रधान मोहिमेतील योजनेअंतर्गत ‘सुधारणा सर्व्हिस ट्रस्ट’च्या उपाध्यक्षपदीदेखील कार्यरत आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी स्कील डेव्हलपिंग इंडिया अंतर्गत देशातील सर्व स्तरातील लोकांना वेगवेगळ्या ४० उद्योगांबाबतीत मोफत प्रशिक्षण देऊन कित्येक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागाशी जोडण्याच्या त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संधी मिळाली, ज्यासाठी तिला एनएसडीसी (नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) तर्फे सन्मानित केले गेले. मिसेस युनिव्हर्सच्या सहभागातून जगाला संदेश देण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि जीवनशैलीतील बदलामुळे लोक आरोग्यापासून आणि स्वतःपासून दूर जात आहेत, त्यामुळे दर्जेदार जीवनासाठी स्व-निपुणतेवर (सेल्फ मास्टरी) काम करणे आवश्यक असल्याचा संदेश त्या यानिमित्ताने देऊ इच्छितात.

Dnyaneshwar: