आयुष्य हा एक रंगमंच आहे अन् आपण या रंगमंचावर हजारो पात्र वठवणारे कलाकार. माझा प्रवासही असाच काहीसा म्हणावा लागेल. पुण्यातील देहूगाव रसाळ या छोट्या खेडेगावात माझा जन्म झाला. वडील शिक्षक असल्याने त्यांची सातत्याने बदली व्हायची. दहावीपर्यंत अशी डझनभर गावं बदलावी लागली. एखाद्या गावची नाळ जुळायची तेवढ्यात आम्ही पुढच्या गावात विस्थापित झालेलो असायचो. पदवीपर्यंत शिक्षणही मराठी कला शाखेतूनच पार पडलं. कॉलेज सुरू असलं तरी लहानपणापासून शिक्षणाचा, अभ्यासाचा कधीच गंध नव्हता. अशातच कॉलेजातील एकांकिका स्पर्धेच्या टीममध्ये एका भिकार्याच्या पात्रासाठी निवड झाली अन् आयुष्य ३६० अंशांत फिरून गेलं. मग यापुढील करिअर नाटकातच करायचे, अशी मनाची तयारी करून कामाला लागलो.
दरम्यानच्या काळात बार्टी प्रशिक्षण केंद्राच्या फिल्ममेकिंग अॅण्ड एडिटिंगच्या कोर्ससाठी मुंबईमध्ये माझी निवड झाली. चुनाभट्टीला हॉस्टेलवर राहून बोरिवलीला नाटकाच्या प्रॅक्टिसला जाऊ लागलो. नाटकाची अन् चित्रपटनिर्मितीची बाराखडी गिरवून झाली अन् आता पुढे काय करायचे, हा प्रश्न आ वासून पुढे ठाकला. मात्र गिरीश कर्नाड यांच्या जगप्रसिद्ध हयवदन नाटकात काम करण्याची संधी मिळाली अन् करिअरच्या नवा वाटा खुणावू लागल्या. नाटकात एकीकडे आयुष्य सुखरूप पार पडत असताना आर्थिक परिस्थिती मात्र भयंकर धक्के देत होती. शेवटी रंगीबेरंगी मुंबईतून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.
भावाच्या कंपनीत त्याच्या हाताखाली टेक्निकल हेड म्हणून जॉब करू लागलो. मात्र नाटकाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. काम उरकल्यावर शहरातील कॉलेजात जाऊन छोट्या-मोठ्या एकांकिका बसवू लागलो. श्वास, कोड्याचा आड यांसारख्या एकांकिका दिग्दर्शित केल्या. अॅसिडहल्ल्याच्या प्रश्नावर बनवलेल्या स्वीकारतो या नाटकाने तर छप्परफाड यश मिळवले. पुरुषोत्तम, फिरोदियासारख्या प्रथितयश एकांकिका स्पर्धाही गाजवल्या. सध्या जॉब सोडून अर्थार्जनासाठी लहानसा उद्योग सुरू केला आहे. मात्र नाटकासाठी असलेले हे वेड असेच कायम ठेवून आयुष्य हवे तितके समृद्ध करून घ्यायचेय एवढे मात्र नक्की…