पुणे : भारतीय संरक्षण क्षेत्रात सशस्त्र दलांची ताकत वाढविण्यासाठी संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) आणि देशातील खासगी उद्योग व स्टार्ट अप हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपकरणे, शस्त्रास्त्र आणि प्रणाली विकसित करण्यावर भर देत आहेत. याचाच एक भाग म्हणून डीआरडीओने ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग’ या स्टार्ट अपच्या मदतीने मानवविरहित शस्त्रास्त्रयुक्त बोटीची निर्मिती केली आहे. तीन रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात येणाऱ्या या मानवविरहित बोटींची नुकतीच डीआरडीओच्या अधिकाऱ्यांद्वारे पुण्यातील भामा आसखेड धरणावर यशस्वी चाचणी करण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘डिफेन्स एक्स्पो २०२२’च्या कार्यक्रमापूर्वी या चाचण्या पुण्यात घेण्यात आल्या आहेत. शस्त्रास्त्र असलेल्या या बोटींच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करण्यासाठी ही चाचणी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या जलाशयात करण्यात आली. यामुळे आता सागरी सुरक्षेच्या आणि हिंदी महासागर परिसरात देशाची क्षमता सिद्ध होणार आहे.
सागरी सीमाभागात गस्त घालणे, पाळत ठेवणे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवत वेळेत कारवाई करण्यासाठी माहिती पोचविणे, अशा सर्व बाबी या बोटींच्या माध्यमातून साध्य होणार आहेत. भविष्यात या बोटींच्या वापर केल्याने विविध कारवाईमध्ये होणाऱ्या जीवितहानी टाळली जाऊ शकते. देशाची सागरी सीमा पाहता सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. ही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाद्वारे हिंदी महासागरात अनेक मोहिमा राबविण्यात येत आहेत.