मुंबई | Sudhakar Badgujar On Deepak Kesarkar – शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ‘सामना’ला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी बंडखोर आमदारांवर चांगलीच टीका केली आहे. बंडखोर आमदारांना ताकद दिली ही माझी चूक आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, हे भाग्य माझं भाग्य आहे, असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले.
तसंच बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवावी, असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यानंतर आता शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेना खरंच वाचवायची असेल, तर त्यांनी आजही मातोश्रीवर परत जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधावा, असं त्यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, या दीपक केसरकरांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता सुधाकर बडगुजर म्हणाले, “यात दीपक केसरकर यांचा संबंध कुठे आला? त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधी ऐकले? केसरकर 2014 साली शिवसेनेत आले. नारायण राणेंच्या धाकाने इकडे आलेला हा माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 2012 साली झालं आणि केसरकर 2014 साली शिवसेनेत आले. त्यामुळे आता ते जे काही पोपटपंची करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून हा माणूस मला लबाड वाटतो. तो ज्या पद्धतीने बोलतो, त्याची नजर सांगते की हा भामटा माणूस आहे” अशी टीका सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.