मुंबई | बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनातील गोष्ट ओळखणाऱ्या मध्य प्रदेशातील बागेश्वर धाममध्ये देशभरातून लोक जात आहेत. धीरेंद्र शास्त्रींची चर्चा असतानाच आता 32 वर्षीय सुहानी शाह चर्चेत आली आहे. धीरेंद्र शास्त्रींप्रमाणेच सुहानी शाहदेखील (Suhani shah) लोकांच्या मनातील गोष्ट ओळखत असल्याचा दावा तिने केला असून ती स्वत:ला माईंड रीडर असल्याचं सांगते. गंमत म्हणजे ती फारशी शिकलेली नाही. ती फक्त इयत्ता पहिलीपर्यंतच शाळेत गेली आहे. अशी ही ‘जादू परी’ म्हणून ओळखली जाणारी सुहानी शाहदेखील आता प्रचंड वायरल होत आहे.
आपण जिच्याबद्दल बोलत आहोत ती सुहानी शाह लहानपणापासूनच या व्यवसायात आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी तिने पहिला शो केला. सध्या सुहानी 32 वर्षांची आहे. तिचा पहिला शो 1997 साली अहमदाबाद, गुजरातमधील 'ठाकोर भाई देसाई' हॉलमध्ये झाला होता.
एवढेच नाही तर सुहानी शाह स्टेज शो सुद्धा करते. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 1.2 दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स आहेत.
सुहानी शाहने करीना कपूर, झाकीर खान, सायना नेहवाल आणि संदीप माहेश्वरीसह अनेक लोकांसोबत स्टेज शेअर केला आहे. सुहानीचे लहानपणापासूनच जादूगार बनण्याचे स्वप्न होते. तिच्या पहिल्या शोपासून ती माईंड रीडिंग करते.
सुहानी शाह स्वतः बद्दल सांगताना माईंड रीडर, कॉर्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच आणि प्रोफेशनल हिप्नोथेरपिस्ट म्हणून उल्लेख करते. सुहानीने 5 पुस्तकेही लिहिली आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ती जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये तिचे शो करत आहे.
सुहानी शाह तिच्या माईंड रीडिंगच्या शक्तीला कला आणि विज्ञानाचा मेळ असल्याचा सांगते. ती इतर जादूगारांना कलेचे प्रशिक्षणही देत आहे.