जी-२० परिषदेपूर्वी ब्राझीलमध्ये आत्मघाती हल्ला, स्फोटात हल्‍लेखोर ठार

जी-२० परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असताना बुधवारी (दि.१३) आत्‍मघाती हल्‍ल्‍याने ब्राझील हादरले. सर्वोच्‍च न्‍यायालयाबाहेर झालेल्‍या स्‍फोटात हल्‍लेखोर ठार झाला आहे. ब्राझीलमध्‍ये होणार्‍या जी-२० परिषदेमध्‍ये जगातील २० मुख्‍य अर्थव्‍यवस्‍था असणार्‍या देशांचे नेते सहभागी होणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग लवकरच ब्राझीलला भेट देणार असून, यापूर्वी झालेल्‍या हल्‍याने देशभरात खळबळ माजली आहे.

सुप्रीम कोर्टात हल्‍ल्‍याचा कट

ब्राझील सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या इमारतीजवळ पार्किंगमध्‍ये आत्‍मघाती हल्‍ला झाला. त्यानंतर काही सेकंदांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दुसरा स्फोट झाला. ब्राझीलच्या मध्‍यवर्ती सरकारच्या मुख्य इमारतींना जोडणार्‍या चौकातील प्लाझा ऑफ थ्री पॉवर्सजवळ हे स्फोट झाले. हल्‍लेखारांना सुप्रीम कोर्टाची इमारतीला लक्ष्‍य करायचे असल्‍याचा अंदाज प्राथमिक तपासात व्‍यक्‍त केला जात आहे. पोलिसांनी स्फोटक शोधक रोबोटसह बॉम्ब पथक तैनात केले आहे.

न्‍यायाधीशांना सुरक्षितस्‍थळी हलवले

आत्‍मघाती बॉम्‍बस्‍फोट घडवून आणण्‍यात आला तेव्‍हा सुप्रीम कोर्टाचे न्‍यायाधीश न्‍यायालयाच्‍या आवारातच होते. त्‍यांना तत्‍काळ सुरक्षितस्‍थळी हलवण्‍यात आले, असे न्यायालयाच्‍या प्रशासनाने प्रसिद्‍ध केलेल्‍या निवेदनात म्हटले आहे. फेडरल डिस्ट्रिक्टच्या व्हाईस गव्हर्नर सेलिना लिओ यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना त्या व्यक्तीने स्फोटकांचा स्फोट केला. तो कारमधून आला होता. या कारमध्‍येच दुसरा स्‍फोट झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Rashtra Sanchar: