मुंबई | Sukesh Chandrashekhar – 200 कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुकेश या प्रकरणी तिहार तुरूंगात आहे. तसंच सुकेशसोबत आत्तापर्यंत अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींची नावं जोडली गेली आहेत. यामध्ये ईडीनं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचीही चौकशी केली आहे. तसंच या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. यामध्ये आता सुकेश चंद्रशेखरनं (Sukesh Chandrashekhar) मोठं विधान केलं आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी जॅकलिनचाही सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी जॅकलिनला समन्स बजावला होता. तसंच तिला सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावं लागलं होतं. यावेळी जॅकलिननं सुकेश विरोधात जबाब दिला होता. यानंतर आता आरोपी सुकेशनं एक नवीन विधान केलं आहे.
आरोपी सुकेश चंद्रशेखरनं सांगितलं की, 200 कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा सहभाग नव्हता. त्यामुळे तिला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण मी तिचं रक्षण करण्यासाठी इथे आहे, असं विधान सुकेश चंद्रशेखरनं केलं आहे. सुकेशला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यानं हे विधान केलं आहे. यासंदर्भातलं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.