मुंबई | Sumbul Touqeer – गेल्या काही दिवसांपासून अब्दु रोझिक (Abdu Rozik) आणि एमसी स्टॅन (Mc Stan) यांच्यात वाद सुरू आहे. अब्दु आणि स्टॅन यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. त्यामुळे आता ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) च्या घरात तयार झालेली मंडली तुटणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसंच अब्दुनं स्टॅनवर काही आरोप केले आहेत. स्टॅननं शिवीगाळ केली आणि गाडीचं पॅनल तोडलं असल्याचा आरोप अब्दुनं केला आहे. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं स्टॅनच्या टीमनं सांगितलं. या वादावर आता ‘बिग बाॅस’ फेम सुम्बुल तौकिरनं (Sumbul Touqeer) प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस 16’च्या घरात तयार झालेली मंडली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, साजिद खान, निमृत कौर, सुम्बुल तौकीर खान, अब्दु रोझिक यांची मैत्री चर्चेचा विषय ठरली. मात्र बिग बाॅसच्या घराबाहेर आल्यानंतर स्टॅन व अब्दुमध्ये एक वेगळाच वाद निर्माण झाला. याबाबत आता सुम्बुलनं भाष्य केलं आहे.
सुम्बुल म्हणाली की, “प्रत्येक नात्यात चढ-उतार येत असतात. मी प्रत्येकवेळा म्हणते की, वेळ ही निघून जाते. अब्दु आणि स्टॅनमध्ये खरी मैत्री आहे. मैत्रीमध्ये वाद होतच असतात. ते दोघं प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांच्यामधील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. तसंच कित्येक मित्रांमध्ये वाद होतात पण ते वाद कोणालाही दिसत नाहीत”.
“आता भांडणं होत आहेत पण पुढे सगळं ठिक होईल. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्यातील वाद संपेल अशी आशा करुया”, असंही सुम्बुल म्हणाली.