नांदेड | Nanded Govt Hospital Death – नांदेडच्या शासकीय रूग्णालयात (Nanded Govt Hospital) झालेल्या रूग्णांच्या मृत्यूमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. नांदेड मृत्यूप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर आता या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची कानउघडणी करत सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.
उच्च न्यायालयानं दाखल केलेल्या या याचिकेवर गुरूवारी सकाळी तातडीची सुनावणी पार पडणार आहे. तर न्यायालयानं राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी राज्य सरकारची कानउघडणी करताना म्हटलं आहे की, जर औषधांची टंचाई, मनुष्यबळाची कमतरता अशा कारणांनी मृत्यू होत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. दरम्यान, राज्य सरकारनं गुरूवारी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.