स्वराज्य ते सुराज्य

शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे यांना मिळालेली वागणूक ही चर्चेचा विषय ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, अधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांचा झालेला अपमान संभाजी महाराज आणि त्यांचे पाठीराखे नक्कीच विसरणार नाहीत. छत्रपती संभाजी महाराज पक्ष स्थापन करीत आहेत. मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. स्वराज्य ते सुराज्य निर्मिती करू इच्छित आहेत. लोकशाही मजबूत करण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाला आणि त्यांच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या खासदारकीचा कालखंड ३ मे रोजी संपला. याच दिवशी त्यांनी १२ मे रोजी आपण आपली पुढील वाटचाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी आपली वाटचाल आणि राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे. या महत्त्वाकांक्षामध्ये अपक्ष म्हणून राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर स्वराज्य या संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर केले.

छत्रपती संभाजी महाराज यांना भारतीय जनता पक्षाने आदराने अथवा राजकारणाचा भाग म्हणून खासदार केले होते. याप्रसंगी भाजपविरोधात आणि त्यापुढे जाऊन ब्राह्मणांवर जातीयवादी टीकाटिप्पणी करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा असलेले संभाजी महाराज यांना फडणवीसांनी खासदारकी द्यावी, अशा आशयाच्या विधानाची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्याला जातीयतेचा वास येत होता. खरेतर शरद पवार संयमी आहेत. अशाप्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून जाहीरपणे येते, तेव्हा त्यांच्या संयमाचा बांध फुटला होता, हे स्पष्ट झाले होते. छत्रपतींच्या हाताखाली फडणवीस काम करीत असतात, मात्र आता फडणवीस छत्रपतींना खासदारकीचे नियुक्तिपत्र देतात आणि तेही आपल्या विरोधात असलेल्या पक्षाचे. याचा आत्यंतिक त्रास शरद पवारांना झाला हे लपले नाही.

खरेतर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या टिळक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद परंपरेने, तहहयात कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या गादीकडे आहे. मात्र सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी तहहयात स्वतःला नियुक्त करून घेताना सातार्‍याच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांना संचालक करण्याचे औदार्य शरद पवार यांना दाखवता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर आणि सातारा गादीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. या वंशजांमध्ये एक साम्य आहे. दोघेही राष्ट्रपतीनियुक्त खासदार. दोघेही भारतीय जनता पक्षाचे खासदार. मात्र शरद पवार यांनी या दोघांकडेही मतांपुरते लक्ष दिले.

निवडणुकीसाठी या दोघांचाही वापर करणे अथवा वापर न करण्याचे ठरवून ते आचरणात आणले. या सगळ्याचा विचार आता संभाजी महाराज नक्की करतील असे वाटते. खा.उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी क्षाला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश करत पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली.पावसात झालेल्या शरद पवार यांच्या सभेची आठवण याच निवडणुकीची सांगितली जाते.अर्थात पवार यांच्या जिगरला सलाम करताना,त्यांच्या त्या सभेचा उपयोग शशिकांत शिंदे,दीपक पवार,सत्यजितसिंह पाटणकर यांना अजिबात झाला नाही हे पण मान्य केले पाहिजे.

छत्रपती संभाजी महाराजयांनी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. मात्र भविष्यात ती राजकीय पक्ष होऊ शकते असे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सक्रिय राजकारणासाठी ते मैदानात उतरणार हे नक्की आहे. मराठा आरक्षणामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी आहे. साहजिकच मराठा समाजाला त्यांच्याबद्दल आपुलकी तर युवकांमध्ये प्रेम आहे. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याबद्दलही असाच करिष्मा पाहायला मिळतो. साहजिकच आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष म्हणून स्वराज्य पक्ष उतरणार असेल तर, त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर नक्कीच होईल. शरद पवार स्वतःला धर्मनिरपेक्ष , नास्तिक असे सोयीनुसार म्हणवून घेत असले किंवा त्यांचे पाठीराखे म्हणत असले तरी त्यांच्या पक्षात मराठा समाजचे प्राबल्य आहे हे अमान्य करता येणार नाही.

आरक्षणाबाबत मराठा समाजाचीच द्विधा अवस्था असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे अशा द्विधा मनस्थितीतील मंडळी वळणार नाहीत,असे ही ठामपणे सांगता येणार नाही. साहजिकच त्यांच्या पक्षाचा पहिला दणका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसणार आहे.महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार असल्याने अपयशाचे खापर त्यांच्या माथ्यावर फुटणार.पवार यांच्या राजकीयखेळ्यांमुळे त्यांच्या पक्षाला लागलेले ते ग्रहण असेल आणि या ग्रहणातून ते सहजासहजी बाहेर पडतील असे वाटत नाही .एकीकडे भारतीय जनता पक्ष त्याना जातीयवादी ठरवत आहे .

नास्तिक ठरवत आहे. देवधर्माच्या विरोधात शरद पवार असल्याचे वारंवार सांगत आहेत. आणि या हल्ल्यावर शरद पवार यांना, ते तसे नाहीत असे सांगावे लागत आहे. याचंच अर्थ ते निधर्मी नाहीत आणि निधर्मी नाहीत म्हणजे हिंदू धार्जिणे आहेत.सबब ते मुस्लिम विरोधातही असू शकतात असा अन्वयार्थ भारतीय जनता पक्ष अप्रत्यक्षरीत्या लावत आहे. बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे.शरद पवार हे राज ठाकरे, भाजपच्या चक्रव्युहात अडकत चालले आहेत. अशा वेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष त्यांचीही डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.

मराठा समाजाचा नेता शरद पवार आहेत हे यापूर्वी एकमुखी मान्य केले जायचे. मात्र मराठा समाजातीलच शाहू महाराज यांचा वशंज जेव्हा या समाजाचे नेतृत्व करतो, तेव्हा शरद पवार यांची मराठा समाजाच्या नेतृत्वाची भूमिका दुय्यम ठरायला सुरुवात होते.याचा ही विचार करण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजी महाराज , मराठा आरक्षणासाठी लोकशाहीच्या सर्व मार्गांचा अवलंब करत आहे. त्यांनी महाराष्ट्र भ्रमण केले , तज्ज्ञांची मते समजवून घेतली , मराठा समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला,युवकांशी संवाद साधला. खासदार म्हणून, संसदेत या प्रश्नावर चर्चाही केली. आता पक्ष स्थापन करून निवडणूकही लढवतील . या सगळ्या प्रक्रियेमुळे त्यांच्या बरोबर जनमत निर्माण होऊ लागले आहे.

शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात त्यांना मिळालेली वागणूक ही चर्चेचा विषय ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध खात्याचे मंत्री , अधिकारी यांच्या उपस्थितीत संभाजी महाराजांचा झालेला अपमान संभाजी महाराज आणि त्यांचे पाठीराखे नक्कीच विसरणार नाहीत. संभाजी महाराज छत्रपती पक्ष स्थापन करत आहेत. मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. स्वराज्य ते सुराज्य निर्मिती करू इच्छित आहेत. लोकशाही मजबूत करण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाला आणि वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.

Dnyaneshwar: