सभा की भास ?

रविवारी एकूण चार सभा झाल्या. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून शासकीय योजना मांडल्या. त्यांचे भाषण प्रचारकीच होते, तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे व अजित पवार यांच्या सभा या जनतेला विकासाचा भास निर्माण करून देण्यासाठी घेतल्या होत्या.

रविवारी राज्यभरात एकूण चार महत्त्वाच्या सभा झाल्या. चार पक्षांच्या या चार सभा झाल्या. राजकीय पक्षांच्या प्रचारकी थाटाच्या या सभांना प्रचंड गर्दी होती. आता ती गर्दी स्वयंप्रेरणेने झाली होती, की पैसे देऊन आणली होती हा नेहमीप्रमाणे चर्चेचा विषय. या सभांमधून सर्वसाधारणपणे , आम्ही कसे योग्य व बरोबर आणि विरोधक चूक. हे वारंवार सांगण्यासाठीच या सभा घेतल्या जात आहेत. सत्ताधारी पक्षाने पुन्हा २०२४ मध्ये सत्ता आमच्या हातात द्या, असे आवाहन केले.

तर विरोधक सत्ता आमच्या हातात द्या, असे सांगत सत्तारूढ पक्षाला आव्हान देत होते. नव्या युती, आघाडीला त्यांनी जनतेकडे सत्ता मागायला खरेच काही तात्त्विक भूमिका, विचार, गांभीर्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्याचा लसावि म्हणजे, जनतेने कायम गरीब, बिचारे, हीनदीन राहावे, आमच्या मेहरबानीवर जगावे व आम्हाला आमच्या दोषांसह सत्तेचे लाभ निमूटपणे उपभोगू द्यावेत असा आहे. कालच्या अग्रलेखात आम्ही या सभा बंद करा. जनतेला शांततेत जगू द्या.

त्यांना त्यांच्या जगण्याची पद्धत, कोणत्याही गोंधळाशिवाय ठरवू द्या, असे या निर्लोभी, परोपकारी, अत्यंत चारित्र्यवान, सज्जन, न्यायप्रिय, संवेदनशील राजकीय नेत्यांना आवाहन केले होते. सांगितले होते. अर्थात हे राजकीय नेत्यांना समजत नाही असे नाही, मात्र ते त्यांचा स्वभाव बदलत नाही आणि म्हणून आपण आपला त्यांना सांगायचा स्वभाव बदलायचा नाही. तेव्हा एकूणच झालेल्या तीन राजकीय व एक शासकीय सभेमुळे रविवार हा रविवार न राहाता रवि’वॉर झाला होता.

सगळेच पक्ष जनकल्याणाचा आव आणत, त्या आवरणाखाली आपला सत्ता स्थापनेचा हेतू जाहीर करताना दिसले. ऐकायला येत होते. उद्धव ठाकरे कथित ठाकरे शैलीत जे काही बोलले, ते त्यांनीच त्यावर विचार करायला लावणारे होते. एके काळच्या आपल्या कार्यकर्त्यांची, लोकप्रतिनिधींच्या अब्रूची लक्तरे काढताना काही वर्षांपूर्वी आपण त्यांना शाबासकी देत होतो, त्यांचे कौतुक करत होतो याचे भान उद्धव ठाकरे यांना राहिले नाही.

शारीरिक ठेवणीवरून टीकाटिप्पणी करणे, प्राण्यांची उपमा देणे, ज्या शब्दांनी आपली अब्रू गेली तेच शब्द अट्टहासाने भाषणात वारंवार हेतुत: वापरणे हा प्रकार त्यांचा पोरकटपणा दाखवणारा. राज ठाकरे यांचे भाषण काही मुद्दे स्पष्ट करणारे असते. मात्र त्या मुद्द्यांवर तेच किती काळ ठाम राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे मतदारांना अजिबात वाटत नाही. बरं त्यांच्या पक्षाच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्यावर विश्वासही ठेवला होता. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांचे कर्तृत्व, आंदोलने करणे आणि ती सोडून देणे किंवा ठाम विचारसरणीचा अभाव हे मुद्दे पाहता त्यांनीच त्यांच्या हाताने मतदारांचा आपल्यावरील विश्वास संपवला.

अजित पवार कर्तृत्ववान असले तरी तेही विश्वासाच्या बाबतीत राज ठाकरे यांच्या हातात हात घालून वाटचाल करीत आहेत. दोन्ही पुतणे विश्वासार्हतेच्या बाबतीत एकाच वाटेवर आहेत. एक मात्र सत्य आहे शरद पवार यांनी काय पेरले हे रविवारच्या बीड येथील भाषणात छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. शरद पवार ओबीसी समाजाविरोधात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. साहजिकच शरद पवारांची पेरणी हळूहळू महाराष्ट्र राज्यासमोर येत आहे.

शरद पवार यांची राजकीय कारकीर्द त्यामुळे आता एकाकीपणाकडे वाटचाल करीत आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. केवळ भावनेच्या खेळावर शरद पवार अजून किती दिवस तग धरणार? याशिवाय कोल्हापूर येथील त्यांनी केलेल्या भाषणाचा प्रभाव तरी किती काळ शिल्लक राहणार? हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Prakash Harale: