पुणे | Pune News – सध्या सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीला लागले आहेत. यासोबतच पुणे (Pune) लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. पुण्यात लोकसभा निवडणूकीसाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत असतानाच आता आणखी एक नवीन नाव समोर आलं आहे. या नावाचा भाजप गांभीर्यानं विचार करत आहे, त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा पत्ता कट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यात लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचं नेतृत्व कोण करणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. यासाठी अनेक नावं समोर आली आहेत. यामध्ये माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि दिवंगत नेते गिरीष बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावं उमेदवारासाठी चर्चेत होती.
अशातच आता पुणे लोकसभेसाठी भाजपकडून एका नवीन नावाचा विचार सुरू आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनिल देवधर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच भाजपचे राष्ट्रीय नेतृत्वही सुनिल देवधर यांच्या नावाचा गंभीररित्या विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.