नागपूर : (Sunil Gavaskar On Garry Sobers) भारतीय लोक अंधश्रद्धाळू आहेत, असा ठपका कायम त्यांच्यावर ठेवला जातो, पण भारतीयांपेक्षाही अंधश्रद्धाळू विदेशातील लोक असतात. त्यातही एका ‘सेलिब्रिटी’कडून दुसऱ्या ‘सेलिब्रिटी’ला हा अनुभव येत असेल तर मग विचारायलाच नको. दोन महान क्रिकेटपटू ‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकर आणि वेस्टइंडिज खेळाडू गॅरी सोबर्स यांच्यातला हा किस्सा ऐकून क्रिकेटप्रेमीदेखील अवाक् झाले. खुद्द गावसकरांनी नागपुरात हा किस्सा सांगितला.
किंगस्टन क्रिकेट क्लबमध्ये बारावा खेळाडू म्हणून खेळताना गॅरी सोबर्स यांनी अतिशय सोपा झेल दिल्याने सुनील गावसकर यांचे संघातील स्थान निश्चित झाले. दुसऱ्या टेस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना गॅरी सोबर्स यांच्या छातीला चेंडू लागला व त्यानंतर गावसकर यांनी शतक ठोकले. त्यावेळी दोन्ही संघाचे कक्ष आजूबाजूला असल्याने गॅरी सोबर्स रोज सकाळी भारतीय खेळाडूंच्या चेंजिंग रूममध्ये येऊन जायचे. एकदा त्यांनी गावसकरला स्पर्श केला आणि ते खेळायला गेले. त्यावेळी त्यांनी शतक ठोकले. चोथ्या टेस्टच्या वेळी ते आले आणि गावसकरांना म्हणाले, “लेट मी टच यू” आणि होकाराची वाट न बघता गावसकरांना स्पर्श करून गेले व १७८ रन काढले.
पाचव्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा स्पर्श करून गेले आणि १३२ रन काढले. सहाव्या दिवशी भारतीयांची फलंदाजी होती आणि गावसकर फलंदाजीला जाणार होते, पण गॅरी सोबर्स येणार, गावसकरांना स्पर्श करून जाणार आणि जिंकणार म्हणून अजित वाडेकर यांनी गावसकरांना बाथरूममध्ये बंद केले. गॅरी सोबर्स येऊन परत गेले आणि वाडेकरांनी गावसकरांना बाहेर काढले. त्या सामन्यात गॅरी सोबर्सला अपयश आले. त्यांची फलंदाजी असताना पहिल्याच चेंडूवर गॅरी सोबर्स ‘क्लीन बोल्ड’ झाले, अशा प्रकारचा किस्सा त्यांनी सांगितला.