मुंबई | शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपने दहीहंडीचं आयोजन केलं आहे. तसंच वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असताना देखील आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधण्याची वेळ आली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गोविंदा असो किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रयत्न केले तरी वरळी शिवसेनेपासून तुटणार नाही,” असं सुनील शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर सध्या भाजपचे सुरु असलेले दहीहंडी आयोजनाचे प्रयत्न बालिश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दहीहंडी सोहळ्याचं आयोजन आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी केलं आहे. येत्या शुक्रवारी (19 ऑगस्ट) वरळीच्या जांबोरी मैदानात हा दहीहंडी सोहळा होणार आहे. वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवक असतानाही दहीहंडी सोहळ्याच्या आयोजनात भाजपने बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दहीहंडी उत्सवासाठी शिवसेनेकडून पर्यायी मैदान शोधलं जात आहे.
यासंदर्भात आमदार सुनील शिंदे म्हणाले, “वरळीत मी स्वत: दहीहंडीचं आयोजन करत होतो. वरळीतीली जांबोरी मैदान दोन-अडीच कोटी रुपये खर्च करुन नव्याने तयार करण्यात आलं आहे. आता जांबोरी मैदानात पुन्हा दहीहंडी आयोजित केली तर या मैदानाची दुर्दशा होईल.”