पुणे : (Sunil Shelake On Amol Kolhe) चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपला आहे. उद्या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा खुला सामना रंगला. या निवडणुकीत भाजपची तगडी फौज मैदानात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील स्थानिक प्रभावी नेतृत्वाची उणीव भरुन काढण्याची भूमिका मावळचे आमदार सुनील शेळके यांनी यशस्वीपणे पार पाडली.
त्यामुळेच सुरुवातीला भाजपच्या बाजूने झुकलेली ही निवडणूक अटीतटीची होणार यावर शिक्कामोर्तब झाले. निवडणुकीचा निकाल किंवा हार-जीत जनता ठरवेल, पण, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तगडा नेता गवसला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सुरूवातीपासूनच आमदार सुनील शेळके यांच्याकडे सोपवली होती. पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून शेळके यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीची बाजू प्रभावीपणे मांडण्याची भूमिका ठेवली. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शेळके यांनी पुढाकार घेतला. त्यासोबत त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कडाडून टीका करण्याचे धाडस दाखवले.
एकीकडे स्टार प्रचारकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर नाव असलेले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचारातून काढता पाय घेतला. त्यामुळे फर्डा वक्ता असलेल्या अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीची चांगलीच गोची केली. दुसरीकडे अजित पवारांच्या हुकमी एक्काने अर्थात सुनील शेळकेंनी मैदान मारत राष्ट्रवादीत आपली जागा वरच्या क्रमांकावर स्थापित केली आहे.