प्रभादेवी प्रकरणावर सुनिल शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर पोलीस अधिकारीही भयभीत झाले”

मुंबई | Sunil Shinde Reaction On Prabhadevi Case – प्रभादेवीमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. तसंच हा गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारीदेखील भयभयीत झाले होते, अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

यावेळी सुनील शिंदे म्हणाले, “इकडचे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी स्वत: रात्री पोलीस ठाण्यात आलो होतो. मी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु घडलेल्या प्रकारानंतर पोलीस अधिकारीही काळजीत होते, भयभीत झाले होते. असा प्रकार आम्ही यापूर्वी कधीही बघितला नव्हता”.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी आज (11 सप्टेंबर) दादर पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करत शिवसेना गटातील लोकांवर गुन्हे हटवण्याची आणि शिदे गटातील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केली असून शिंदे गटातील संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसंच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलला 395चा गुन्हा देखील मागे घेण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याचं सावंत म्हणाले.

Sumitra nalawade: