मुंबई : मलिक यांनी ईडी विरोधातील कारवाईवर दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं याप्रकरणी ताताडीचा दिलासा नाकारल्याच्या निर्णयाला मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तातडीच्या सुटकेची मागणी केली होती. मलिकांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. नवाब मलिकांच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.
मात्र, याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्यानं न्यायालय सध्या तरी, यात सध्या हस्तक्षेप करू इच्छित नाही. तुम्ही नियमित कोर्टात रितसर जामीनासाठी अर्ज करू शकता. असं स्पष्ट करत ही याचिका ऐकण्यासच नकार देत ती फेटाळून लावली आहे. मलिकांसाठी जमेची बाजू म्हणजे, तपासयंत्रणेनं त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. गुरूवारी ईडीनं मलिकांविरोधात 5 हजार पानांचं आरोपपत्र कोर्टात सादर केलं आहे, यात 9 खंड असल्याची माहिती आहे. या आरोपपत्रावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याची प्रत आरोपीला लवकरात लवकर देण्याचे निर्देश पीएमएलए कोर्टानं दिले आहेत.