नवी दिल्ली – Supreme Court On Mission Agneepath : १४ जून रोजी केंद्र शासनाने तिन्ही सशस्त्र दलातील सैन्यभरतीच्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. आणि ‘मिशन अग्निपथ’ नावाची नवीन योजना भरतीप्रक्रियेसाठी लागू केली होती. मात्र, योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरातील सैन्य भरतीची तयारी करत आलेल्या तरुणांकडून योजनेचा मोठ्या स्तरावर विरोध करण्यात आला. देशातील अनेक ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक स्वरूप देखील प्राप्त झाले होते. त्यानंतर योजनेविरोधात प्रकरण न्यायालयात पोहोचले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज त्यावर सुनावणी करण्यात आली आहे.
अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या तीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली, केरळ, पंजाब, हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयांत त्याचबरोबर, कोचीमधील सशस्त्र सेना न्याय प्राधिकरणासमोर देखील या अग्निपथ योजनेच्या विरोधातील याचिकांची सुनावणी सुरु आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात ही याचिका स्वीकारणे योग्य ठरणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित निर्णय न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सुर्यकांत आणि ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पहिली याचिका वकील शर्मा यांनी दाखल केली होती. सुनावणी दरम्यान शर्मा यांच्या उत्कट युक्तिवादानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी तुम्ही वीर बनू शकता अग्निवीर नाही म्हणत शर्मा यांची मजेशीर फिरकी घेतली. त्यामुळे सुनावणीदरम्यान चांगलाच हशा पिकला होता. न्यायमुर्तींची फिरकी माझ्यासाठी कौतुकाची थाप असल्याचं शर्मा यानी सांगितलं.