नवी दिल्ली | Supriya Sule – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न वरचेवर चिघळत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं घेतली आहे. त्यांचा विरोध पाहता महाराष्ट्रातील मंत्र्यांनी त्यांचा बेळगाव दौरा रद्द केला आहे. मात्र, कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नेते नारायण गौडा बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं असून, त्याला हिंसक वळण लागलं आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तसंच याचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटलेले पाहायला मिळत आहेत.
आजपासून (7 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून संसदेत खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात भूमिका मांडताना सुप्रिया सुळेंनी अमित शाह (Amit Shah) यांनाही या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
“गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्रात एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण, त्यांना मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या विरोधात गेल्या 10 दिवसांपासून षडयंत्र करण्यात आलं. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करत सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तसंच, सुप्रिया सुळेंची मागणी फेटाळून लावत “तो तुमचा प्रश्न आहे. दोन राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र सरकार काय करणार? हे संसद आहे. हे अजिबात चालणार नाही”, असं ते म्हणाले.