बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं होतं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज बारामती तालुक्यात दौऱ्यावर असताना त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर हे पोस्टर कोणी लावले? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावणे. याचाही कुणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.