पुणे : (Supriya Sule On Devendra Fadnavis) उर्फी जावेद आणि चित्रा वाघ या दोन महिलांमधील वादाने आता वेगळं वळण घेतलं आहे. राज्यातील एकही राजकिय नेता नाही त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुण्यात (Pune) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
उर्फी जावेद (Urfi Jawed) आणि अन्य महिलांच्या प्रकरणावरुन भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला नेत्यामध्ये सध्या टीका टिप्पणी सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच टीकेला सुरुवात करतात असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान त्या म्हणाल्या, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा असून महिलांचा सन्मान करणारा आहे. ती महिला कोणाची तरी आई, बहीण, पत्नी आणि मैत्रीण आहे. त्यामुळे देवेंद्र जी माझ्या घरात जशी एक मुलगी आहे. तशी तुमच्या घरात देखील एक मुलगी आहे. त्यामुळे महिलांवरील आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजे. गलिच्छ राजकारण थांबले पाहिजे. या सर्व घडामोडी लक्षात घेता, माझी देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण उपमुख्यमंत्री म्हणून पुढाकार घ्यावा. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निश्चितच पुढे येऊ, अशी मागणी त्यांनी केली.