“शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय”

पुणे | Supriya Sule On Eknath Shinde’s Group – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “शिंदे सरकार हे असंवेदनशील, विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज (10 जुलै) पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “विठ्ठलाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत, गोवा, गुवाहाटी फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखं आहे. सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसते आहे. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी करत आहे. त्यामुळे यामध्ये सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मात्र भरडला जात आहे. त्यांना सर्वसामान्यांचं काही घेणं देणं नाही. शिंदे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे.”

Sumitra nalawade: