वर्धा : (Supriya Sule On Loksabha 2023) शरद पवार आणि पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. मात्र, अजित पवार गटामुळे सध्या पक्षाचं सर्वच चित्र बदलले आहेत. या राजकीय बदलांनंतर बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना तगडं आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात. त्यामुळेच आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून सुप्रिया सुळे विदर्भातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सुप्रिया सुळे यांचं एक वक्तव्य या चर्चेला निमित्त ठरलं आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने पावन झालेल्या वर्ध्यातून निवडणूक लढवायला नक्की आवडेल, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. वर्धा दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
वर्धा हा खूप पवित्र असा जिल्हा आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या पावन भूमीत मला काम करण्याची संधी मला मिळाली तर मला नक्कीच आवडेल. मात्र वर्ध्यातून निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पक्षच घेईल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
वर्धा मतदारसंघात सध्या भाजपचे रामदास तडस हे खासदार आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्ध्यातून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा भाजपचा विचार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र नेमकं कोण कुठून लढणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.