मुंबई | Jitendra Awhad – शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (1 मे) पक्षाच्या अध्यक्षपादावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. तसंच राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) होणार असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांवर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
“याबाबत मला काहीही माहिती नाही. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा याच मताचा मी आहे. बाकी मला काहीही माहिती नाही. नव्या अध्यक्षाबाबत कोणतीही बैठक झाली नाही किंवा चर्चाही झालेली नाहीये. तसंच याबाबत इतर कुणाच्या बैठका झाल्या असतील तर त्याविषयी मला माहिती नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे अध्यपद कोण सांभाळणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं चार नावांची चर्चा सध्या सुरू आहे. यात अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल या चौघांच्या नावाची चर्चा होत आहे.