मुंबई | Supriya Sule Talk About PM Narendra Modi – झी मराठी वाहिनीवर एक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 29 जुलैपासून ‘बस बाई बस’ या नव्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. मात्र हा कार्यक्रम प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कार्यक्रमाचा सुत्रसंचालक सुबोध भावेनं सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक खेळ खेळला. सुबोधनं त्यांना काही नेत्यांचे फोटो दाखवले. हे फोटो पाहून सुप्रिया सुळेंनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. या खेळादरम्यान सुप्रिया सुळेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दाखवण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींशी चक्क गुजराती भाषेत संवाद साधला आहे. सध्या हा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “नमस्कार मोदीजी कसे आहात तुम्ही, मी गुजरातला जाऊन आले. तिथे सगळं ठिक आहे. गुजरात खूप सुंदर आहे. तिथे मला दर्शनाबेन भेटल्या. त्यांनी मला सुरतला गेल्यावर फाफडाही खायला दिला. मी सुरतलाही गेले होते. तिकडे काही आमदारही होते. ते रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबलेत याची मला काही माहितीच नव्हती. अमित शाह पण तिथे होते. ते रोज संसदेत येतात. ते मस्त भाषण करतात. पण तुम्ही संसदेत येत नाहीत. तुम्ही या ना, फार छान वाटेल आम्हा सर्वांना. तुम्ही या आणि माझं भाषण ऐका, मला फार आवडेल. मी गुजराती भाषा बोलायला थोडं थोडं शिकत आहे. मी थोडं गुजराती, थोडं मराठीत बोलते”.
“गुजरातचे आणि महाराष्ट्राचे संबंध मोरारजी भाईंच्या काळापासून चांगले आहेत. आपली पहिली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. तेव्हा मी, तुम्ही आणि अनुराग ठाकूर आपण मॅच पाहायला गेलो होतो. तुम्ही या पुन्हा आपण मॅच पाहायला जाऊ, फार मजा येईल. तुम्ही पंतप्रधान आहात, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे मला कल्पना आहे. चला मी निघते”, असंही सुप्रिया सुळे मोदींसोबत संवाद साधताना म्हणाल्या.