‘सूर नवा ध्यास नवा’चा आगळावेगळा धाडसी उपक्रम
पुणे : रिॲलिटी शोच्या इतिहासात एक नावीन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा “ या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलंय. सुरेल स्पर्धक, कुशल वाद्यमेळ, अभ्यासू सूत्रधार आणि नवोदित गायकांना पैलू पाडणारे रसिकप्रिय नि पारखी परीक्षक यांनी सजवलेली सुरेल मैफल ही जरी “सूर नवा”ची आजवरची ओळख असली तरी आता आणखी एक नवी ओळख नि नवा ध्यास घेऊन “सूर नवा“चा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॉडक्शन्सने उचलला आहे. संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम आहे.
प्रत्येक आठवड्यात “सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर आपलं गाणं उत्तमोत्तमरीत्या सादर करण्याचा ध्यास घेऊन सर्वोत्तम ठरणारा त्या त्या आठवड्यातील गायक सुवर्णकट्यार मिळवण्याचा मान मिळवतो. या पर्वात सुवर्णकट्यारीचा मान मिळवणाऱ्या त्या आठवड्यातील गायकाला मराठी संगीतक्षेत्रातील नावाजलेल्या संगीतकाराकडे सोपवले जाणार आणि त्या संगीतकाराकडून आपलं स्वतःचं नवंकोरं गाणं मिळवण्याची सुवर्णसंधी त्या गायकाला मिळणार आहे. “सूर नवा ध्यास नवा“च्या या अभिनव उपक्रमातील ही पहिलीच सुवर्णसंधी सांगलीच्या शुभम सातपुते या गुणी गायकाने मिळवली असून विचारशील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि कवी-गीतकार मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं एक सुरेख नवं गाणं शुभम सातपुते याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे.
“प्रत्येक स्पर्धेत एकच विजेता असतो नि तोच बऱ्याचदा ठळकपणे दिसतो. पण सूर नवाच्या या स्पर्धेचं, या पर्वाचं वेगळेपण असं की, प्रत्येक आठवड्याचा सर्वोत्तम गायक हा एक विजेता असणार आहे. त्याच्या नावावर त्याचं स्वतःचं गाणं नोंदवलं जाणार आहे. कुठल्याही स्पर्धकाला याहून मोठी गोष्ट काय असणार. पार्श्वगायक म्हणून या मंचावरच त्याची ओळख प्रस्थापित होणं यापेक्षा त्याला मोठं बक्षीस काही असूच शकत नाही आणि हे फक्त सूर नवाच्या मंचावरच घडू शकतं, असं अभिमानाने सांगावंसं वाटतं!“ असं या उपक्रमाविषयी बोलताना ‘सूर नवा ध्यास नवा ‘ चे परीक्षक आणि निर्माते अवधूत गुप्ते म्हणाले.
“रिॲलिटी शोमध्ये घडणारी अत्यंत विलक्षण अशी घटना आहे. स्पर्धक गायकांसाठी अतिशय दुर्लभ अशी गोष्ट स्पर्धेच्या या टप्प्यावर त्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल एकविरा प्रॅाडक्शन्स आणि कलर्स मराठीचे खूप कौतुक आहे. नावाजलेल्या संगीतकार नि गीतकारांचं गाणं कारकिर्दीच्या या टप्प्यावर मिळणं नि ते या अशा मोठ्या मंचावरच प्रथम सादर करायचं भाग्य लाभणं, ही कितीतरी मोठी उपलब्धी आहे. त्या अर्थाने हे सगळे स्पर्धक खूप नशीबवान आहेत. या अनोख्या गोष्टीमुळे स्पर्धेलाही धार येईल नि ’सूर नवा‘ची मैफिल आणखीनच बहारदार होत जाईल!“ असं या उपक्रमाविषयी बोलताना परीक्षक महेश काळे यांनी सांगितलं.