संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार… शरद पवार खरंच असं म्हणाले? राष्ट्रवादीने मांडली बाजू

मुंबई : (Suraj Chavan On Sharad Pawar) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मनाबाद शहरांचे नामांतर करुन, संभाजीनगर आणि धाराशीव असे करण्यात आलं होतं. तेव्हापासून शहरांच्या नामांतराचा मुद्दा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडमुळे ठाकरेंचं सरकार कोसळलं अन् शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी करत नवं सरकार स्थापन केलं. नवं सरकार येताच शिंदे-फडणवीसांच्या सरकारनं महाविकास आघाडीच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयाला ब्रेक लावला.

शिंदे सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करत नव्यानं शासन निर्णय जारी केला. या नामांतराविषयी आता पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नामांतराला विरोध केल्याचं सांगत मी संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार, असं वक्तव्य केल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं. मात्र शरद पवार यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचा खुलासा आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्विट करत शरद पवारांबाबत प्रसारित झालेल्या बातमीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच हे वृत्त देणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहरांच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही. एका वृत्तवाहिनीने याबाबत सोडसाळपणा केला आहे. या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत, असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवारांनी आपल्या सरकाऱ्यांसोबतचा एक किस्सा सांगितला. यावेळी ते म्हणाले की, काल जाफराबादवरून येताना एक सहकारी म्हणाला की, मला समृद्धी महामार्ग बघायचा आहे. त्या रस्त्याने आम्ही औरंगाबादला आलो. दरम्यान आपल्याकडून बोलण्याच्या ओघात शहराचा उल्लेख औरंगाबाद झाला असल्याचं लक्षाच येताच पवार यांनी स्वतःला दुरुस्त केलं आणि संभाजीनगर म्हणत मला वाद वाढवायचा नसल्याचं सांगितलं.

Prakash Harale: