मुंबई | शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अत्यंत कमी कालावधीत फायर ब्रँड नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ठाकरे गटाच्या नेत्या, शिंदे-भाजप सरकारवर सणकून टीका करणाऱ्या नेत्या अशी ख्याती मिळवलेल्या सुषमा अंधारे यांचे बॅनर्स जागोजागी झळकत आहेत. याच मोठमोठ्या बॅनर्समुळे सुषमा अंधारे यांच्या आयुष्यात सुखद घटना घडली आहे. सुषमा अंधारे यांचे हे बॅनर्स पाहून त्यांच्या घरातून निघून गेलेला भाऊ युवराज जाधव तब्बल 18 वर्षांनी परतला आहे. ताईंचे हे फोटो पाहूनच माझे पाय पुन्हा घरी येण्यासाठी वळले, अशी प्रतिक्रिया अंधारे यांच्या भावाने दिली.
तब्बल 18 वर्षांनी भाऊ परतल्यामुळे सुषमा अंधारे यांनी आनंद व्यक्त केला आहे. “भाऊ परतल्यामुळे आम्ही सगळेच आनंदी आहोत. हो थोडंसं धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहे. स्वत: युवराजसाठीही हे थोडं अवघड आहे. आम्ही सगळेच भावनिक गोंधळात आहोत. पण काहीही असो आज 18 वर्षांनी आमचं वाट बघणं संपलेलं आहे. आमचा भाऊ आमच्यासोबत आहे. यापेक्षा आणखी काय हवं,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
सुषम अंधारे यांचे बंधू युवराज जाधव यांनीदेखील घरी परतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. मी सध्यातरी गोंधळलेला आहे. मी माझ्या परिवाराला तब्बल 18 वर्षांनी भेटत आहे. मी माझ्या ताईमुळेच त्यांना सापडू शकलो,” असे युवराज जाधव यांनी सांगितले.