मुंबई | Sushama Andhare On Chitra Wagh – शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. सुषमा अंधारेंच्या याच टीका-टिप्पणींवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी खोचक शब्दातं भाष्य केलं आहे. आमची नक्कल करून त्या टाळ्या, शिट्ट्या मिळवतात. आमची नावं घेऊन त्यांचं दुकान चालत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या नवी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
“प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमची मिमिक्री करून त्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळवतात. पण मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारनं काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललंच पाहिजे, असं काहीही नाही. त्या त्यांचं काम करत आहेत, आम्ही आमचं काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं नाव घेऊन त्यांचं दुकान चालत असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी ट्विटरद्वारे खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाणसारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीये…”, अशी मिश्कील टिपण्णी सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.